नेमका वाद काय :
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर या गावामध्ये कमान बांधण्यावरून काही वर्षापासून वाद चालू आहे. गावच्या वेशीवर ही कमान बांधायची होती. आणि त्या कमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यायचं होतं. मात्र या मागणीला गावातील सवर्ण समाजातुन विरोध होत होता.
पांढरी खानापूर गावातील मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबडेकर नाव देण्याच्या मागणीचा वाद गेल्या महिन्याभरापासून वाढला होता.
मात्र कमानीला गावातील काही सवर्णाकडून विरोध होत असल्याने २०० पेक्षा अधिक गावकऱ्यांनी 6 मार्च रोजी गावकऱ्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
या मागणीसाठी गावकरी गावापासून मुंबईतील मंत्रालयाच्या दिशेनी त्याच दिवशी पायी निघाले. पण आंदोलकांनी अमरावती गाठत विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात बस्तान मांडले.
वातावरण कधी बिघडलं :
२०२० पासून या मागणीची कसलीही अंमलबजावणी होत नसल्या कारणाने पांढरी खानापूर येथील २०० पेक्षा अधिक दलित समुदायाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू ठेवलं होतं.
यावरती सामंजस्याने तोडगा निघणार होता. मात्र लेखी पत्राची मागणी करत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मंगळवार दिनांक १२ मार्च २०२४ पासून पांढरी खानापूर येथे तणावपूर्ण शांतता पसरली होती मात्र आयुक्तालयाच्या समोरील परिस्थती हाताबाहेर गेली. काही आंदोलक आयुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्याचा परिणाम म्हणून आंदोलकांनी दगडफेक सुरू केली.
यात काही आंदोलक तर ५/६ पोलीस जखमी झाले आहेत
अधिकार्यांचा प्रयत्न :
आंदोलनादरम्यानच ७ मार्च २०२३ ला विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याशी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती. मात्र तरीही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर आंदोलनाला विविध सामाजिक राजकीय संघटनांनी समर्थन दिले होते.
पोलिसांची भूमिका :
दगडफेक सुरू झाल्यानंतर आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आणि लाठीचार्ज सुरू केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शांतता ठेवण्याचा आवाहन केले आहे तसेच सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं देखील सांगितले आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विरोध :
बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीसाठी गावातील दलित बांधवांनी फंड उभारला. मात्र अपुऱ्या फंडमुळे तात्पुरती लोखंडी कमान उभारण्यात आली. कालांतराने पक्की कमान उभारू, अस गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
कमान उभारणीपर्यंत आक्षेप नव्हता, पण बांधकाम पूर्ण झाल्यावर विरोध केला जातोय, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे.
लोकसभा निवडणूक बघून कुणी हे केलंय का? – प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, “कमानीच्या संदर्भात गावात ठराव झाल्यानंतर अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर हे असं होतंय तर याच्यामागे राजकारण आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आम्हाला त्या राजकाणाचा भाग व्हायचं नाहीये. गावात आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहायला हवी.”
आंबेडकर पुढे म्हणाले, “दोन्ही गटांमध्ये काही निर्णय न होता डीपीडीसीमध्ये तो व्हावा आणि ती कमान शासनच बांधेल असं व्हावं, असं मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय. कालच्या मोर्चात गावातले किती आणि बाहेरचे किती लोक होते, हाही अँगल तपासावा अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
“हे लोकसभा निवडणूक बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरुपात केलेलं आहे का? ते नेमकं कुणी केलंय? ते मी शोधून काढायला सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण गढूळ व्हावं, यासाठी यात कुणाची भूमिका आहे का? हे तपासायला हवं